एक अपूर्ण शिल्प !!!

एक अपूर्ण शिल्प

देवा! तू हे विश्व, इतकं सुंदर घडवलयं,
मग,अजुनही एक शिल्प अपुर्णच का राहीलयं ?

कित्येक वर्षांच हे मौनव्रत तोडायचय मला
स्वरांशीही नात आज जोडायचय मला
फक्त एकच क्षण देवा, मला वाचा दे
प्रेमाने एकदाचं, "आई" म्हणायचय मला
तुझ शांततेच देणं मी मुकेपणाने झेललयं
अजुनही एक शिल्प अपुर्णच राहीलयं
तू घडविलेल, रंगबिरंगी जग पाहीचय मला
पदोपदी आधारच जिणं,फेकून द्यायचय मला
फक्त एकच क्षण देवा,मला द्रुष्टी दे
एकदा डोळे भरून, आरशात पाहीचय मला
संपूर्ण आयुष्य मी अंधारात काढलय़ं
अजुनही एक शिल्प अपुर्णच राहीलयं
एकदा स्वत:च्या पायांवरती उभं राहीचयं मला
काखेतल्या या कुबड्या फेकुन द्यायचायत मला
फक्त एकच क्षण देवा, माझ्या पायात बळ दे
गणपतीच्या मिरवणुकीत मनसोक्त नाचायचय मला
हे बांडगुळाच जिवन आता जडं होत चाललय
अजुनही एक शिल्प अपुर्णच राहीलयं
देवा अशी कित्येक शिल्पे तू अपुर्णच ठेवलीस
चांगल्या देहास तरी, कुठे चांगली मने दिलीस
या अपुर्णते मुळेच तर तुझी जाणीव आहे
आमच्या अपुर्णत्वात, तुझ्या पुर्णत्वाची उणीव आहे
हे मात्र तू चांगलच राजकारणं केलय
म्हणून तर प्रत्येक शिल्प अपुर्ण राहीलयं
......ॐकार

No comments: